Sunday, July 27, 2014

एसपीचा शोध...

१२ जुलै  २०१४. वार-शनिवार, पहाटेच मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांचा फोन आला. पोलंडचा एक पत्रकार आलाय. त्याला खर्ड्याची केस अभ्यासायची आहे आणि लगेच खर्ड्याला जायचंय. आम्ही मुंबईतून निघतोय. तू तयार हो. हा त्यांचा निरोप. 
 पावेल गुला हा मूळ पोलंडच्या. तो पत्रकार, चित्रपट दिग्दर्शक, माहितीपट निर्माता आहे. सध्या अनेक देशांत फिरून ऑनर किलींगच्या घटनांवर लघूपट बनवतोय. त्या अनुषंगानं खर्ड्याची केस त्याला ही केस अभ्यासायची होती. छायाचित्रण करायचं होतं. खर्ड्याला जाऊन नितीन आगेचे आई-वडिल, त्याचसोबत तपास अधिकाऱ्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. 
दुपारच्या वेळी अहमदनगरला पोहचलो, नितीनचे वडील ठरल्याप्रमाणे नगरला आले होते. त्यांच्याशी केस व तपासासंदर्भात चर्चा झाली. मुलाखत झाली. मुलाखतीतून येणारे व्यस्थेबद्दलचे धक्कादायक अनुभव कॅमेर्यात कैद होत होते.
 कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे, ते पोलिसच जेव्हा कायदा मोडतात तेव्हा पिडितानं दाद मागायची तरी कोणाकडं ? केसचा तपास आरोपी आणि प्रशासन यांच्या संगनमतानेच चाललाय की काय ? कायद्याची व न्यायव्यवस्थेची धिंड काढण्याचं काम सरकार व पोलिस करत आहेत का ?असे एक ना अनेक प्रश्न या मुलाखतीनं आणि पुढं लिहीलेल्या अनुभवांनी निर्माण केले होते.
आम्ही गेलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसात काय घडलं ? हे सांगण्यापूर्वी  त्याच्या अगोदर ही केस नक्की काय आहे ते पाहुयात. २८ एप्रिल २०१४ ला नितीन आगे या १७ वर्षीय मुलाचा जातीयवादी वृत्तीच्या लोकांनी निर्घृन खून केला होता. त्याच दिवशी त्याचा मृतदेह गावाजवळच्या एका टेकडीवरच्या झाडाला लटकविण्यात आला व हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सांगणं यासाठी, की आजच वर्गामध्ये खर्ड्याला काय घडले ? हे पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या माझ्या काही विद्यार्थी मित्रांना माहिती नव्हतं.  दलित अत्याचार आणि माध्यमं हा वेगळा महत्त्त्वाचा विषय आहे. त्यात जायला नको.
28 एप्रिलच्या रात्री नितीनचं पोस्टमार्टम झालं. वारंवार मागणी करूनही हा रिपोर्ट नितीनचे वडील राजू आगेंना देण्यास तपास अधिकारी टाळाटाळ करत होते. राजू आगेंनी त्यासाठी केलेले अर्ज त्यांनी दाखविले. अट्रॉसिटीची केस असल्यामुळे प्रकरणाचा तपास उपाधिक्षक स्तराच्या अधिकाऱ्याकडे आहे. या पोलिस उपाधिक्षकाने चार अर्ज करून सुद्धा हा रिपोर्ट देण्यास टाळाटाळ केली. शेवटी सुबोध मोरे व पावेल गुला यांनी जाऊन या पोलिस उपाधिक्षकासोबत वाद घालून हा रिपोर्ट राजू आगेना मिऴवून दिला. त्याचं चित्रण पावेल कडं उपलब्ध आहे. पोलिस का रिपोर्ट देत नव्हते ? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे हे प्रश्न आजही खैरलांजी सारखे अनुत्तरित आहेत.
ज्या माणसानं इतक्या क्रुरपणे आपला मुलगा गमावला आहे त्याला सहकार्य तर सोडाच उलट तपासणी यंत्रणा त्यांना मानसिक त्रास देण्यात तत्पर ठरत होती. ही यंत्रणा नितीनला न्याय मिळवून देईल, या बद्दल मी तरी शाशंक आहे.    
अशा घटनेत कायद्यानुसार 60 दिवसांच्या आत चार्जसिट दाखल होणे गरजेचं होतं. घटना घडून अडीच महिना उलटून गेला तरी नितीनच्या आईचा जबाब पोलिसांनी नोंदविलेला नव्हता. नितीनच्या मृत शरीराचे पोलिस पंचनाम्यातील फोटो पालकांना भेटले नाहीत, आय विटनेस घेतले गेले नाहीत. 
राज्यात गाजलेल्या  अशा प्रकरणात पोलिसांची भूमिका इतकी संशयास्पद असेल तर बाकी प्रकरणात काय? राजू आगेंनी तक्रारींचा हा पाढा वाचून दाखविल्यावर महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे पोलिस राजू आगेंना भेटत नाहीत आणि तपासा संदर्भात माहिती देत नाहीत. एकूणच पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू आहे असं जाणवले.
12 तारखेला पोलिसांनी कायद्याचा मांडलेला खेळ आणि मृत नितीनच्या वडिलांना मिळणारी वागणूक याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे एस. पी. यांना देण्याचं ठरलं व कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज देण्याचं ठरलं. राजू आगेंचा तक्रारीचा अर्ज एस. पी. ना देण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफीसला गेल्यानंतर कळलं की, एस. पी. गुरूपौर्णिमेच्या बंदोबस्तासाठी शिर्डीला गेलेत. तर दुसरीकडे तपास अधिकारी मेडीकल लिव्ह वर होते. पी. एम‌. रिपोर्टच्या प्रकरणानंतर हे महाशय लगेच मेडीकल लिव्ह वर गेले होते.
महिती देण्यासाठी व अर्ज स्विकारण्यासाठी अहमदनगर पोलिसांकडं एकही अधिकृत व्यक्ती त्या दिवशी उपलब्ध नव्हती. एसपी,  डीवायएसपी  कोणीच फोन उचलत नव्हते. वाट पाहून, फोन ट्राय करून उपयोग नसल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही थेट अहमदनगर पोलीस  कंट्रोल रूम गाठली.  तत्पूर्वी शिर्डीत असणाऱ्या काही पत्रकारांशी संपर्क केल्यानंतर कळालं, की एसपी तर तिथं नाहीयेत, मग प्रश्न निर्माण होतो एसपींच्या पीए ला साहेब कुठं आहेत हे माहित नव्हते की एसपी देखील या पोलिसांना पाठीशी घालत होते व त्यामुळंच भेट टाळत होते. हे सगळं षड्यंत्र लक्षात येत होतं. 
पोलिस कंट्रोल रूममध्ये गेल्यावर त्यांना सांगितलं, की एसपींना भेटायचं आहे किंवा कमीत कमी फोन वर संपर्क करून द्या. त्यांची भेट झाल्याशिवाय आम्ही कंट्रोल रूम मधून हलणार नाही. या सर्व घडामोडींचं चित्रण माझ्याकडं उपलब्ध आहे. 
आमच्या या न हलण्याच्या भूमिकेमुळं उपस्थित पोलिसांनी एसपीचा शोध सुरू केला. आश्चर्य वाटेल जिल्ह्याच्या कंट्रोल रूम मधून 100 ते 120 फोन करून, 3 तास एसपीचा संपर्क होत नव्हता. आता या ठिकाणी जर एखादी बिकट परिस्थिती असती तर, पण ही तर दलित अत्याचाराची केस ना. कंट्रोल रूम मधून सगळीकडं संदेश पाठवले जाऊ लागले होते. एसपींच्या अंग रक्षकांपासून ते त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर कॉल ट्राय करणं चालू होतं. पण एसपी मात्र सापडत नव्हते. परदेशी पत्रकारासमोर एसपीला संपर्क साधण्याची कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांची केविलवाणी धडपड चालू होती. एकंदरीत एसपी आम्हाला टाळत होते, हे लक्षात आलं होतं. दलितांच्या केसेस मध्ये महाराष्ट्रातील पोलिसांच्या भूमिकेबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या आणि त्या दिवशी  त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.
 जातीय अत्याचाराच्या एवढ्या महत्त्वाच्या केसमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकाराला, मृताच्या पालकांना तपासाबद्दल माहिती द्यायला, त्याच्या तक्रारी ऐकून घ्यायला एसपींना वेळ नसणे ही संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांसाठी शरमेची व मान खाली घालायला लावणारी बाब होती. यातून तपास यंत्रणेचं जातीय चरित्र स्पष्टपणे दिसत होतं. 
शेवटी पोलिसांनी आम्ही काही हलत नसल्याचं पाहून शहर पोलिस उपाधिक्षकांना पाचारण केले. त्यांनी तक्रार अर्ज स्विकारला. तरी आम्ही एसपींना भेटण्याच्या मागणी वर ठाम होतो. शेवटी नाईलाजानं या साहेबांनी एसपींच्या प्रायव्हेट नंबर वर फोन केला.
आता जे घडले ते महत्त्वाचे आहे. या साहेबांनी फोन केल्यावर एसपींनी आम्हांला उत्तर दिलं, की मी परदेशी पत्रकाराला सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय भेटू शकत नाही, हे लेखी स्वरूपात द्यायला त्यांनी अपेक्षेप्रमाणे टाळाटाळ केली. म्हणजे सरकारमधील कोण व्यक्ती आहे जी पोलीस अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलू देत नव्हती ? 
 आमच्या रेट्यामुळं त्यांनी सुबोध मोरे, राजू आगे व मी असा लोकांना पुढच्या  दिवशी (रविवार, 13 जुलै ) भेटण्याचं मान्य केलं. पावेल सोबत नसेल या अटीवर. शहर उपआधिक्षकांनी त्यांची वेळ व भेट घडवून देण्याचं आश्वासन दिले.
त्या क्षणापासून आत्ता पर्यंत एसपी व शहर पोलिस उपाधिक्षक आम्हांला भेटतच आहेत. ज्यांनी भेट घडवून आणायचं मान्य केलं होतं त्यांना ठरलेल्या दिवशी 20 ते 30 फोन, आठवण करून देणारे 5 ते 6 संदेश पाठविले. त्यांनी ना फोन उचलला ना मेसेजचा रिप्लाय केला. आम्ही मात्र पुढचा नाशिकचं शूट रद्द  करून नगरला  थांबलो. दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिलो. 
अशी आहे दलितांच्या केसेसमध्ये  तपास यंत्रणांची व सरकारची भूमिका. आमचा मात्र अहमदनगर एसपींचा शोध अजून सुरूच आहे. सदर  एसपी व  शहर उपाधिक्षक कोणाला भेटले तर या प्रकरणाची आठवण करून द्या. कोणाला त्यांचा नंबर हवा असल्यास मला मागा. लोकसत्तानं त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांना आठवण करून दिली आहे. पण अजून फरक पडलेला नाही. न्यायासाठी आपण सर्व एसपीला शोधू या व जवाब विचारूया  ?
केस कधी कोर्टात उभी राहिल माहिती नाही. पण न्याय मात्र नक्कीच मिळणार नाही हे सध्याच्या परिस्थितीतून वाटतंय. केस कमकुवत करण्यात येत आहे. दलितांसाठी न्याय अजूनही नजरेत नाही. कारण व्यस्थेनंच तुमच्या विरोधात दंड थोपटलेत. असो न्याय व्यवस्थेवर विश्र्वास दाखवूयात... न्यायाची वाट पाहूया तर.




लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

2 comments:

  1. खरच या व्यवस्थेत आणि व्यवस्थेचे हस्तक असलेल्या दलित विरोधी भूमिके मुळे आपला हे सर्वत्र पाहायला दिंसत आहे.पूर्ण व्यवस्थाच खोट्याच खर आणि खर्याच खोत करण्यात लागलेली दिसते.दिरंगाई,योग्य कलम न लावणे,रेपोर्ट,जबाब अशा अनेक गोष्टी पासून ती केस कमकुवत केली जाते.

    ReplyDelete
  2. स्पष्ट सांगायचे तर कोपर्डीचा निकाल आणि पाठोपाठ आलेल्या खर्ड्याच्या नितीन आगे केसचा निकाल देऊन इथल्या शासन आणि समाज व्यवस्थेने (आणि हो ह्यात आपली माननीय, आदरणीय इ इ न्यायव्यवस्था ही आली,) इथल्या दलितांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.तुमची जागा पूर्वीपासून जी होती तीच आहे. जास्त शहाणपणा कराल तर कुत्र्यासारखे मारू, वर समतेच्या गप्पा आम्हीच मारू. मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे कि दलित समाजातले विचारवंत,प्राध्यापक, वकिल, डॉक्टर, विद्यार्थी, कार्यकर्ते का शांत आहेत! बाबानो ढुशी मारल्याशिवाय गाय सुद्धा आपल्या वासराला दुध देत नाही इथेतर अन्यायी,निर्लज्ज आणि कोडगी शासन यंत्रणा आहे समोर उभी.

    ReplyDelete